Stock Market: आशियाई बाजारांतील सकारात्मक संकेत आणि अमेरिका-इराण दरम्यान पुन्हा चर्चा सुरू होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी नोंदवली गेली. दिवसभरातील चढ-उतारानंतर बीएसई सेन्सेक्स 1263.67 अंकांनी म्हणजेच 1.64 टक्क्यांनी वाढून 78,111.24 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी-50 निर्देशांक 388.65 अंकांनी (1.63 टक्के) वाढून 24,231 वर स्थिरावला. दिवसाची सुरुवातही सकारात्मक झाली होती. सेन्सेक्स 77,981 वर उघडला होता (मागील बंद 76,847), तर व्यवहारादरम्यान तो 78,270 या उच्चांकापर्यंत पोहोचला. निफ्टीनेही 24,163 वर सुरुवात करत 24,280 चा इंट्राडे उच्चांक गाठला. Stock Market गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹9.11 लाख कोटींची भर – बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. 13 एप्रिल 2026 रोजी ₹4,49,13,555.17 कोटी असलेले मार्केट कॅप 15 एप्रिलला ₹4,58,25,183.95 कोटींवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ₹9.11 लाख कोटींची भर पडली. जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, “अमेरिका-इराण चर्चेच्या शक्यतेमुळे जागतिक पातळीवरील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरखाली आल्या असून बाजारातील सकारात्मकता वाढली आहे. चौथ्या तिमाहीचा दृष्टिकोन काहीसा कमकुवत असला तरी आकर्षक मूल्यांकन आणि FY27 साठी अपेक्षित चांगल्या कमाईमुळे बाजारातील तेजी कायम राहू शकते.” त्यांनी पुढे सांगितले की, भारताच्या 10 वर्षांच्या रोख्यांच्या उत्पन्नात घट आणि इंडिया VIX मध्ये झालेली कमी ही बाजारातील स्थैर्याची चिन्हे आहेत. पावर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रात मागणी वाढीच्या अपेक्षेमुळे तेजी दिसून आली, तर जागतिक जोखीम कमी झाल्याने आयटी क्षेत्रानेही चांगली कामगिरी केली. (Stock Market) टॉप गेनर्स-लूजर्स – सेन्सेक्समधील समभागांमध्ये इंडिगोने सर्वाधिक 4.63 टक्के वाढ नोंदवली. याशिवाय इटरनल, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टीसीएस, एलअँडटी, एशियन पेंट्स, अदाणी पोर्ट्स, सन फार्मा, कोटक बँक आणि ट्रेंट लिमिटेड हे समभाग वाढीसह बंद झाले. दुसरीकडे भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक हे समभाग घसरणीत राहिले. ब्रॉडर मार्केटनेही दमदार कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 2.20 टक्के आणि 2.35 टक्क्यांनी वाढले. क्षेत्रनिहाय पाहता कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक सर्वाधिक वाढीसह बंद झाला, तर आयटी आणि मीडिया क्षेत्रातही तेजी होती. मात्र पीएसयू बँक निर्देशांक मागे राहिला. जागतिक बाजारांचा प्रभाव – बुधवारी आशियाई बाजारांमध्येही तेजीचे वातावरण होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी सुमारे 3 टक्क्यांनी, जपानचा निक्केई 225 सुमारे 0.59 टक्क्यांनी तर चीनचा सीएसआय 300 निर्देशांक 0.16 टक्क्यांनी वाढला. अमेरिकन फ्युचर्स स्थिर होते. एसअँडपी 500 फ्युचर्समध्ये 0.01 टक्क्यांची किरकोळ घसरण, तर डाऊ जोन्स फ्युचर्स 0.02 टक्क्यांनी वाढले. मंगळवारी एसअँडपी 500 निर्देशांक 1.18 टक्क्यांनी वाढून 6,967.38 वर बंद झाला, जो विक्रमी पातळीच्या जवळ आहे. डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक अनुक्रमे 0.66 टक्के आणि 1.96 टक्क्यांनी वधारले. Stock Market कच्च्या तेलात नरमाई – अमेरिका-इराण चर्चेच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट झाली. होरमुज सामुद्रधुनीतील अडथळे दूर होऊन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्रेंट क्रूड 0.55 टक्क्यांनी घसरून 94.27 डॉलर प्रति बॅरलवर आला, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) 1.1 टक्क्यांनी घसरून 90.24 डॉलरवर पोहोचला. एकूणच, जागतिक घडामोडींचा सकारात्मक परिणाम आणि घटलेला भूराजकीय तणाव यामुळे भारतीय बाजारात अल्पकालीन तेजीचा कल कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. Stock Market: ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 1264 अंकांनी वधारला, निफ्टी 24,200 पार