Stock Market: निर्देशांक कोसळले, परदेशी गुंतवणूदारांकडून विक्री सुरूच

नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालू असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकावर परिणाम होत आहे. सोमवारी जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 638 अंकांनी कमी होऊन 56,788 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 207 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी कमी होऊन 16,887 अंकांवर बंद झाला.
मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बॅंक, आयटीसी, बजाज फायनान्स, स्टेट बॅंक, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली. तर डॉक्टर रेड्डीज, एनटीपीसी, भारती एअरटेल, विप्रो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
युरोप, अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर सकाळपासून भारतीय शेअर बाजारात विक्री चालू राहिली. दरम्यानच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढून 88 डॉलरवर गेल्यामुळेही भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण होते.
अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता परत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सप्टेंबरमध्ये या गुंतवणूकदारांनी 7,600 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 1,565 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. हे गुंतवणूकदार किमान काही महिने तरी भारतीय शेअर बाजारात खरेदी करण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
या गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना भारतीय शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा मिळतो. रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक या गुंतवणूकदारांना परवडत नाही असे विश्लेषकांनी सांगितले.
दरम्यान शेअर बाजारातून परकीय गुंतवणूक परत जात असल्यामुळे त्याचा भारतीय रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. सोमवारी भारतीय रुपयाचे मूल्य 49 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव 81.89 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला होता. रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री करावी लागत असल्याचे दिसून येत आहे





