मुंबई – भारतातील स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही जागतिक पातळीवरील नकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक तीन दिवसापासून एकतर्फी कमी होऊन आता एक महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत. शेवटच्या सत्रात खासगी बँका, ग्राहक वस्तू कंपन्या व आयटी कंपन्यांच्या शेअरची जास्त विक्री झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 275 अंकांनी कमी होऊन 84,391 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 81 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी कमी होऊन 25,758 अंकावर बंद झाला. इटर्नल, ट्रेन्ट, एअरटेल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्स या कंपन्यांना विक्रीचा मार खावा लागला तर या पडत्या काळातही टाटा स्टील, सन फार्मा, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स या कंपन्यांनी निर्देशांकांना आधार दिला. बाजारातील कामकाजाबाबत बजाज ब्रोकिंग या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिकेत व्याजदरात पाव टक्के कपात होणार असली तरी आगामी काळात धोरण कसे असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. कमकुवत होणारा रुपया व परदेशी गुंतवणूकदाराकडून होत असलेल्या विक्रीमुळे निर्देशांक घसरत आहेत. शेअर बाजारात सध्या विक्रीची परिस्थिती असून निफ्टीला 25,700 आणि 25,800 अंकावर चांगला आधार आहे. पीएल कॅपिटलचे विक्रम कासट यांनी सांगितले की, अमेरिकेच्या पतधोरणामुळे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील गुंतवणूकदार सावध आहेत. सध्याच्या विक्रीच्या परिस्थितीतही बुधवारी कमोडिटीज, ऊर्जा, युटिलिटीज, धातू, तेल आणि नैसर्गिक वायु व एफएमसीजी क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते. 2,332 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घर घट झाली तर 1,857 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,760 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 6,224 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. क्षेत्र घट -मिडकॅप 1.08% -स्मॉल कॅप 0.58% -भांडवली वस्तू 0.90% -माहिती तंत्रज्ञान 0.90% -इंडस्ट्रियल्स 0.76% -दूरसंचार 0.69%