मुंबई, – दुसर्या तिमाहीत विकासदर 8.2% या विक्रमी पातळीवर गेल्यामुळे सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र नंतर गुंतवणूकदारांनी विविध कारणावरून नफेखोरी केल्यामुळे निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 64 अंकांनी कमी होऊन 85,641 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 अंकांनी म्हणजे 0.10 टक्क्यांनी कमी होऊन 26,175 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 122 अंकांनी वाढला होता. मात्र नंतर ही पातळी वेगाने कमी झाली. बजाज फायनान्स, सनफार्मा, ट्रेन्ट, महिंद्रा, स्टेट बँक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, मारूती, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. अमेरिका वगळता इतर देशातून नकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री केली. विकास दर वाढूनही रुपयाचा दर मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी ऐवजी विक्री करून नफा काढून घेणे पसंत केले. व्यापार युद्ध आणि परदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारात विक्री या कारणामुळे रुपया घसरत आहे. विकासदर वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा शुक्रवारी 6.47% वरून 6.52% पर्यंत वाढला. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेला व्याजदर करता येणार नाही असे समजले जाऊ लागले आहे. इतर विश्लेषकाबरोबरच बार्कलेज या ब्रोकरेज संस्थेनेही विकास दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला असताना, महागाई कमी पातळीवर असली तरी रिझर्व बँकेला व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकावा लागणार असल्याचे सांगितले आहे. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री चालू असून शुक्रवारी या गुंतवणूकदारानी 3,795 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर 28 नोव्हेंबरपर्यंत 15,649 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. याचा निर्देशांकावर दबाव कायम आहे. रुपया कोसळत असतानाच खनिज तेलाच्या किमती पुन्हा 64 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री केली. सोमवारी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय नऊ महिन्यांच्या निचांंकी पातळीवर गेल्याची आकडेवारी जाहीर झाली. या व इतर कारणामुळे विकास दर वाढूनही निर्देशांक पिछाडीवर राहिले. नफेखोरीचे कारण – -रुपया निचांंकी पातळीवर -व्याजदर कपातीची शक्यता मंदावली -जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण -परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री -खनिज तेलाच्या दरात वाढ -मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी