Share Market : सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट

मुंबई : गुंतवणूकदार सध्या नफेखोरीच्या मनस्थितीत आहेत. शुक्रवारी बँका, धातू, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्क्यापर्यंत घट नोंदणी गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 465 अंकांनी कमी होऊन 83,938 अंकावर बंद झाला. सेन्सेेक्स संदर्भातील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 155 अंकानी म्हणजे 0.60 टक्क्यांनी कोसळून 25,722 कामगार बंद झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री वाढविली आहे. अमेरिकेने नकारात्मक पतधोरण जाहीर केल्यामुळे भारतातीलच नाही तर जगातील गुंतवणूकदार सध्या संदीग्ध मनस्थितीत आहेत.इटर्नल, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिन्सर्व, पॉवर ग्रिड, ट्रेन्ट, एचडीएफसी बँक या बड्या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अॅण्ड टयुब्रो, टीसीएस, आयटीसी, स्टेट बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र त्यामुळे निर्देशांकांना फारसा आधार मिळाला नाही.
बाजारातील घडामोडीबाबत जिओजित इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, कंपन्यांचे ताळेबंद संमिश्र असतांनाच जागतिक बाजारातून संमिश्र संकेत येत असल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. तर काही गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या पतधोरणा नंतर विक्री सुरू ठेवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चर्चेबाबत गुंतवणूकदार आशावादी होते. मात्र या बैठकीतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. इंडस्ट्रियल्स, भांडवली वस्तू व तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र वगळता इतर क्षेत्राचे निर्देशांक घसरले.
शेअर बाजारातील 2,370 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली व 1,784 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 273 अंकांनी व निफ्टी 73 अंकांनी म्हणजे 0.28 टक्क्यांनी कमी झाला. भारतीय शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारातही विक्रीचे वातावरण होते. त्यामध्ये अमेरिकन शेअर बाजाराचा समावेश होता. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 3,077 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.





