Stock Market: सलग चौथ्या दिवशी निर्देशांकात घसरण

मुंबई – जागतिक पातळीवरील महागाईमुळे व्याज दरवाढीचे सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि आशियाई शेअर बाजारांचे निर्देशांक घसरत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा वाढला आहे. यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 427 अंकांनी कमी होऊन 59,037 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 139 अंकांनी म्हणजे 0.79 टक्क्यांनी कमी होऊन 17,617 अंकांवर बंद झाला.
बजाज फिन्सर्व कंपनीचा शेअर आज 5.37 टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, एल अँड टी, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. केवळ हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
युरोप, दक्षिण कोरिया, चीन, जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे. काल या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 4,679 रुपये काढून घेतले. या गुंतवणूकदारांनी विक्री कायम ठेवली तर भारतीय शेअर बाजार निर्देशांकांवर मोठा परिणाम होऊ शकतो. या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात 28 टक्क्यापर्यंत गुंतवणूक आहे.
गुंतवणूकदारांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष
परदेशी गुंतवणूकदार मोठ्या कंपन्यात गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे मुख्य निर्देशांक कमी होत आहेत. मिड कॅप कंपन्यामधील कंपन्याबाबतही नफेखोरी चालू आहे. ही परिस्थिती नजीकच्या भविष्यात सुधारण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातून काय दिशानिर्देश होते या आधारावर गुंतवणूकदारांना पुढील निर्णय घ्यावे लागतील. त्याचबरोबर दीर्घ पल्ल्यासाठी काही ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरची खरेदी करून करण्याचा पर्याय उपलब्ध आहे असे शेअर बाजारातील कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या प्रकाश दिवाण यांनी सांगितले.




