मुंबई: जागतिक स्तरावरील वाढता तणाव आणि अमेरिकेच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १०६५ अंकांनी कोसळून ८२,१८० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३५३ अंकांनी घसरून २५,२३२ वर स्थिरावला. घसरणीची मुख्य कारणे – जागतिक तणाव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली आहे. ग्रीनलँड प्रकरणावरून सुरू असलेल्या वादामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होऊन ९१ च्या पातळीवर गेल्याने बाजारावर दबाव वाढला. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचाही बाजारावर परिणाम झाला. तिमाही निकाल: डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने काही बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली विक्री: सोमवारी, FIIs ने भारतीय शेअर बाजारातून ₹३,२६२ कोटी काढून घेतले. जानेवारीमध्ये आतापर्यंत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून अंदाजे ₹२९,३१५ कोटी काढून घेतले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे एकूण शेअर बाजारावर दबाव राहिला आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मर्यादित खरेदी झाली. जपानमधील राजकीय अस्थिरता: जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केल्यामुळे आशियाई बाजारात चिंतेचे वातावरण होते. गुंतवणूकदारांना ₹९.९० लाख कोटींचा तोटा – बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ₹४५५.७८ लाख कोटींवर घसरले, जे मागील व्यापार दिवशी ₹४६५.६८ लाख कोटी होते. अशा प्रकारे, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे ₹९.९० लाख कोटींनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे ₹९.९० लाख कोटींनी घट झाली आहे. या शेअर्सना बसला फटका: आजच्या घसरणीत ‘इटरनल’ कंपनीचे शेअर्स सर्वाधिक ४ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, सन फार्मा, इंडिगो, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीत बंद झाले. विशेष म्हणजे, सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ एचडीएफसी बँक (HDFC Bank) हा एकच शेअर आज वाढीसह बंद झाला. क्षेत्रनिहाय स्थिती: आज सर्वच क्षेत्रांतील निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली. यामध्ये रिअल्टी इंडेक्स सर्वाधिक ५ टक्क्यांनी कोसळला. ऑटो आणि आयटी क्षेत्रातही २ ते ३ टक्क्यांची घसरण झाली. छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या (मिडकॅप आणि स्मॉलकॅप) शेअर्समध्येही मोठी पडझड झाल्याने किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे धरसोडीचे धोरण आणि जागतिक आर्थिक मंदीच्या सुरुवातीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या जोखमीच्या गुंतवणुकीऐवजी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. जोपर्यंत जागतिक पातळीवर स्थिरता येत नाही, तोपर्यंत बाजारात असाच चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.