Stock Market: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फ्युचर्सच्या व्यवहारावर 0.05% इतका सिक्युरिटीज ट्रांझेक्शन टॅक्स लावला आहे. हा कर अर्थसंकल्पापूर्वी 0.02% इतका होता. त्यामुळे रविवारी शेअर बाजार निर्देशांक कोसळले. मात्र या निर्णयाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समर्थन केले आहे. फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये छोटे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करून नुकसान करून घेत होते. या निर्णयामुळे ते सुरक्षित राहण्याची शक्यता वाढली आहे. अर्थसंकल्पात ऑप्शनच्या व्यवहारावरील सिक्युरिटीज ट्रांझेक्शन टॅक्स 0.1% वरून 0.15% इतका करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या न समजणार्या वित्तीय उत्पादनात जास्त नफ्याच्या आशेने छोटे गुंतवणूकदार गुंतवणूक करून तोटा सहन करतात. याला आवर घालण्याची आवश्यकता बर्याच तज्ञांनी आणि संसद सदस्यांनी व्यक्त केली होती. शेअर बाजार नियंत्रक सेबीने यासंदर्भात केलेल्या अभ्यास अहवालात असे आढळून आले आहे, की फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करणार्या 90% रिटेल गुंतवणूकदारांना तोटा झालेला आहे. त्यामुळे सेबीन व शेअर बाजारांनी किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा प्रकारच्या व्यवहारापासून दूर राहण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत. सितारामन यांनी सांगितले की, मला बर्याच पालकाकडून अशा प्रकारचा कर लावण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. या पालकांनी आम्हाला दूरध्वनी करून आमची मुले अशा प्रकारच्या व्यवहारात पैसे गमावत असल्याचे सांगितले होते. आम्ही फक्त जास्त अंदाजआधारित फ्युचर अँड ऑप्शन्स व्यवहारावरच कर लावलेला आहे. इतर व्यवहारावर कर लावलेला नाही. सरकार आर्थिक शिस्त बाळगणार असल्याचे सांगून त्यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात येणार असल्याचे सांगितले. आयडीबीआय बँकेचे बरेच भागभांडवल लवकरच एलआयसी आणि केंद्र सरकार बाजारात विकणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्या म्हणाल्या. जीएसटी दरात झालेली कपात आणि प्राप्ती कर उत्पन्न मर्यादेत केलेली वाढ या कारणामुळे देशांतर्गत खरेदी वाढत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले. जागतिक अनिश्चिततेमुळे सोने अस्थिर – पत्रकाराशी बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, जागतिक व्यापार विषयक आणि भूराजकीय परिस्थिती कमालीची अनिश्चित झाली आहे. यामुळे जागतिक बाजाराबरोबरच भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमालीचे अस्थिर आहेत. त्याचबरोबर डॉलरला पर्याय म्हणून बर्याच देशाच्या रिझर्व बँका सोने खरेदी करीत आहेत. यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. एकूणच गुंतवणूकदारांचा एखाद्या देशाच्या चलनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हे गुंतवणूकदार सोने खरेदी करून स्वतःला सुरक्षित करीत आहेत.