Share Market: परदेशी गुंतवणूकदारांनी दोन आठवड्यात केली 22,766 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. अमेरिकेत पुढील आठवड्यात पुन्हा व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 22,766 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्या अगोदरच्या काळात हे गुंतवणूकदार भारतातून विक्री करीत होते.
नोव्हेंबर महिन्यात या गुंतवणूकदारांनी तब्बल 21,612 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये 94,077 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सप्टेंबर महिन्यात मात्र या गुंतवणूकदारांनी 57,724 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती. जागतिक परिस्थिती बदलत असल्यामुळे हे गुंतवणूकदार आपल्या निर्णयात बदल करीत असल्याचे दिसून येते. जानेवारीपासून या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 7,747 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. हे प्रमाण बरेच कमी आहे. मात्र आगामी काळात ही गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे.
मॉर्निंग स्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च या संस्थेचे संचालक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, आगामी काळात ही गुंतवणूक अनेक मुद्यावर अवलंबून राहील. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकून जगाबाबत आणि भारताबाबत काय निर्णय घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. देशात आणि परदेशात महागाई कशी वाटचाल करते यावरही परदेशी गुंतवणूक अवलंबून राहील. जगात सध्या दोन युद्ध चालू आहेत तेथील परिस्थिती कशी वळण घेते याकडेही परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
दुसर्या तिमाहीत भारतीय कंपन्यांनी नफा कमी झालेले ताळेबंद जाहीर केले आहेत. परंतु तिसर्या तिमाहीत कंपन्यांनी जर चांगले ताळेबंद जहीर केले तर देशातील गुंतवणूकदाराबरोबर परदेशातील गुंतवणूकदार खरेदी वाढवू शकतील. महागाई आता कमी होऊ लागली आहे.
अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकेल. जर भारतातील निर्देशांक मागे राहीले तर तर परदेशी गुंतवणूकदार भारतातील शेअर बाजाराऐवजी रोखे बाजारात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यानी या वर्षात रोखे बाजारात 1.1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.




