मुंबई – किरकोळ आणि घाऊक किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची माहिती या आठवड्यात केंद्र सरकारने जारी केली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि भारतादरम्यान लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बाराशे अंकांनी म्हणजे 1.48 टक्क्यांनी वाढून 82,530 या सात महिन्याच्या उचांकी पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 395 अंकांनी वाढून 25,062 अंकावर बंद झाला. सकाळी शेअर बाजारात मंद वातावरण होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत- अमेरिकेत दरम्यान व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर दुपारच्या सत्रात मोठा प्रमाणात खरेदी झाली. याचा फायदा बँकिंग, वाहन, माहिती तंत्रज्ञान व तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांना जास्त प्रमाणात झाला. टाटा मोटर्स, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, इटरनल, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एअरटेल, इन्फोसिस कंपनीच्या भावात वाढ झाली. सेन्सेक्स संदर्भातील फक्त इंडसइंड बँकेच्या भावात घट झाली. परदेशी गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढली असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी कमी भरली आहे. त्यामुळे अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार भारतात खरेदी वाढविण्याची शक्यता असते. काल या गुंतवणूकदारांनी 931 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. खनिज तेल बाजारात भारताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक घटना घडत आहेत. खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादन वाढविण्याचे ठरविले असल्यामुळे सध्या खनिज तेलाचे दर कमी पातळीवर आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी आणि देशातील गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले आहे. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण अमेरिका- चीन व्यापार युद्ध कधी झाल्यामुळे गेल्या आठवड्यात जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र आज जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. दक्षिण कोरिया, जपान, चीन, हाँगकाँगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर होते. तर युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराच्या निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली होती.