Stock Market: मंदीची गुंतवणूकदारात पसरली भीती; शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा

मुंबई – जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन समजल्या जाणार्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे मंदीची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक यामुळे कोसळले. याचा परिणाम इतर देशाबरोबरच भारतावरही होत आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ बारा अंकांनी कमी होऊन 74,102 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 37 अंकांनी म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढून 22,497 अंकावर बंद झाला.
अमेरिकन शेअर बाजार चार टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर आशिया आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांकही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आज झालेल्या विक्रेता फटका इन्फोसिस, बजाज फिन्सर्व, महिंद्रा, झोमॅटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, पावर ग्रीड, अॅॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि अदानी पोर्ट्स, टीसीएस या कंपन्यांना बसला. तर सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातील करेक्शन आता संपुष्टात आल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये शेअर बाजारात अस्थिरता असली तरी निर्देशांकाची जास्त हानी झालेली नाही. भारतीय महागाईच्या आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीही जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
देशातील संस्थागत गुंतवणूकदारांचा पुढाकार –
करेक्शन समाप्त होत असल्यामुळे या आठवड्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविली आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री कमी केली आहे. काल परदेशी गुंतवणूकदारांनी 485 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 263 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. या आठवड्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी करून निर्देशांक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.




