मुंबई – सकाळी शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. मात्र बाजार बंद होण्याअगोदर बरीच विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. त्यातल्या त्यात परदेशी गुंतवणूकदारांनी जास्त विक्री केली. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक जवळजवळ अर्धा टक्क्याने कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 331 अंकांनी कोसळून 84,900 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 108 अंकांनी म्हणजे 0.42 टक्क्यांनी कमी होऊन 25,959 अंकावर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, महिंद्रा, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिन्सर्व, टाटा मोटर्सपॅसेंजर व्हेईकल्स इत्यादी कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. टेक महिंद्रा, सन फार्मा, एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. अमेरिकेचे पत धोरण कसे असेल, डॉलर आगामी काळात कशी वाटचाल करतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर भारत- अमेरिका व्यापार करारावर चर्चा चालू आहे. याबाबत संमिश्र संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. तर काही गुंतवणूकदार विक्री करून नफा काढून घेत असल्याचे वातावरण आहे. काही गुंतवणूकदारांनी पुढाकार घेऊन माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी चालूच ठेवली. मात्र इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री कायम आहे. शेअर बाजारातील 3,330 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. 1,209 कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 207 कंपन्यांच्या शेअरचे भाव जैसे थे राहिले. बजाज ब्रोकिंग रिसर्च या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे, की सकाळच्या सत्रामध्ये शेअर बाजारात काही प्रमाणात खरेदीचे वातावरण होते. मात्र दुपारी विक्री वाढली. अमेरिकेच्या व्याजदरबाबत कसलेही संकेत मिळत नाहीत. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री वाढली आहे. भारत व अमेरिकेदरम्यानचा व्यापार करार होईल की नाही, तो कधी होईल, तो कसा असेल, याबाबतही गुंतवणूकदारांच्या मनात शंका आहेत. अशा परिस्थितीत अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफेकवरी केली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1,766 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,161 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.