मुंबई : भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असण्याबरोबरच दुसर्या तिमाहीतील कंपन्यांचे ताळेबंद चांगलेच नफादायक आहेत. त्यातच भारत -अमेरिका व्यापार करार लवकरच होण्यासंदर्भात अनेक सकारात्मक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात खरेदीचे वातावरण आहे. परिणामी सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास मदत झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 388 अंकांनी वाढून 84,950 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 103 अंकांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी वाढून 2613 अंकावर बंद झाला. आता अमेरिकेशी व्यापार संबंध बिघडल्यामुळे निर्देशांकाची झालेली हानी पूर्णपणे भरून निघाली आहे. मात्र यात देशातील किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसते. अमेरिकेतील पतमानांकन संस्थांनी भारतीय शेअर बाजारात आता तेजीचे दिवस आल्याचा निर्वाळा गेल्या आठवड्यात दिला आहे. त्याचबरोबर व्यापार करार होणार असल्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. निफ्टीने आता 26,000 अंकाची पातळी ओलांडली असल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या निफ्टी आगामी काळात वाढत राहण्याची शक्यता ब्रोकर्सनी व्यक्त केली. जिओजीत इन्वेस्टमेंट्स या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांचे भारत – अमेरिकेच्या चर्चेकडे बारीक लक्ष आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार पुढाकार घेऊन खरेदी करीत आहेत. त्यातच मिडिकॅप कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे बरेच गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करीत आहेत. इटर्नल, मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा, टेक महिंद्रा, टायटन, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची विक्री झाली. अमेरिका युरोप व आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर होते. मात्र भारत- अमेरिका व्यापार कराराच्या शक्यतेमुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालू असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 4,968 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 8,461 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू म्हणजे खनिज तेलाचे दर सध्या 63 डॉलर या पातळीवर आहेत.