मुंबई – भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टीसीएसने कमी महसूल असलेला ताळेबंद जाहीर केला आहे. त्याचबरोबर अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध चिघळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी बरीच विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ एक टक्क्याने कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 689 अंकांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी कमी होऊन 82,500 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 205 अंकांनी म्हणजे 0.81 टक्क्यांनी कमी होऊन 25,149 अंकावर बंद झाला. शेअर बाजारातील एकूण नोंदलेल्या कंपन्या पैकी 2,450 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर 1,557 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 158 कंपन्यांच्या शेअरचे भाव स्थिर राहिले. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 1.11 टक्क्यांनी म्हणजे 932 अंकांनी तर निफ्टी 1.22 टक्क्यांनी म्हणजे 311 अंकांनी कमी झाला आहे. काल अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. सकाळी युरोपियन शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले. त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टीसीएसचा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे एकूणच आयटी कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली असे मेहता इक्विटीज या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले. आज झालेल्या विक्रीचा फटका माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहन, रिअॅल्टी, तेल आणि नैसर्गिक वायू इत्यादी क्षेत्रांना बसला. महिंद्रा, एअरटेल, टाटा मोटर्स, टायटन, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, ट्रेन्ट, इन्फोसिस. एचडीएफसी बँक इत्यादी कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीसह अॅक्सिस बँक, एनटीपीसी, इटर्नल, स्टेट बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली.. जागतिक बाजारातही अमेरिकेच्या शुल्क धोरणामुळे कमालीचे नकारात्मक वातावरण होते. सकाळी दक्षिण कोरिया, जपान, शांघाय, हाँगकाँगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याची बातमी होती. युरोप आणि अमेरिकेतही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांनी विक्री करणे पसंत केले. दरम्यान शेअर बाजारांनी जारी केलेल्या माहितीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 221 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदार बरीच खरेदी करीत आहेत. मात्र किरकोळ गुंतवणूकदारांकडून विक्री वाढल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.