मुंबई – अमेरिकेचे पतधोरण 10 डिसेंबरला जाहीर होणार आहे. रुपया कमकुवत होत असताना परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. भारत- अमेरिकेत दरम्यानचा व्यापार करार मार्गी लागण्याची शक्यता मंदावत आहे. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदाराकडून नफेखोरी होत असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात सलग दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली. बाजार बंद होतान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 436 अंकांनी कमी होऊन 84,666 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी म्हणजे 0.47% कमी होऊन 25,839 अंकावर बंद झाला. आज झालेल्या विक्रीचा फटका एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती सुझुकी, सन फार्मा, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स या कंपन्यांना बसला. इटर्नल, टायटन, अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक, स्टेट बँक, बजाज फिन्सर्व, एनटीपीसी, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली. जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेतील व्याजदर 10 डिसेंबर रोजी ठरणार आहेत. रुपया कमकुवत होत आहे. परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. भारत- अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबद्दल संदीग्धता कायम आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते. तर सरकारी बँका, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ होत आहे. अमेरिकेचे व्यापार धोरण जगभर अनिश्चितता निर्माण करीत असतानाच जपानमधील रिझर्व बँक व्याजदरात वाढ करणार आहे. त्यामुळे जपानमधील कर्जरोख्याचा परतावा वाढत आहे. अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण होते. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी 655 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रुपया घसरत असल्यामुळे या गुंतवणूकदारांचा डॉलरमधील नफा एक वर्षापासून वाढत नाही. त्यामुळे त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे कारण दिसत नाही. अशा परिस्थितीत दीर्घ पल्ल्याचा विचार करून देशातील संस्थागत गुंतवणूकदार निर्देशांकांना आधार देण्यात पुढाकार घेत आहेत. मंगळवारी विक्रीचे वातावरण असूनही या गुंतवणूकदारांनी 2,542 कोटी रुपयांची शेअरची खरेदी केली.