मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर सेन्सेक्सच्या घोडदौडीला लगाम बसला असून तो अल्प घसरणीसह बंद झाला. आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या विक्रीच्या दबावामुळे वित्तीय सेवा, एफएमसीजी आणि मेटल क्षेत्रातील तेजीचा प्रभाव ओसरला. व्यवहाराच्या अंती बीएसई सेन्सेक्स ४२.६४ अंकांच्या (०.०५ टक्के) घसरणीसह ८५,५२४.८४ वर स्थिरावला, तर एनएसई निफ्टीने ४.७५ अंकांच्या (०.०२ टक्के) किरकोळ वाढीसह २६,१७७.१५ वर बंद होत आपली आगेकूच कायम ठेवली. सकाळच्या सत्रात बाजार सकारात्मक चिन्हांसह उघडला होता. सेन्सेक्सने ८५,७०४ आणि निफ्टीने २६,२३३ अंकांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. इन्फोसिस आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या आयटी कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने निर्देशांकावर दबाव वाढला. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे समभाग लाल निशाण्यावर बंद झाले. आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या कंपन्यांनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील घसरणीमुळे बाजार सपाट राहिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही संमिश्र कल दिसून आला. स्मॉलकॅप १०० निर्देशांकात ०.३७ टक्क्यांची वाढ झाली, तर मिडकॅप निर्देशांक स्थिर राहिला. जागतिक स्तरावर आशियाई बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते, तर अमेरिकन बाजारातही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपन्यांच्या जोरावर सकारात्मक कल राहिला. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या आगामी जीडीपी आकडेवारीवर आणि औद्योगिक उत्पादनाच्या डेटावर केंद्रित आहे, कारण या आकडेवारीवरून बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. आयपीओ बाजारातही आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. ‘गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी’चा आयपीओ दुसऱ्या दिवशीही खुला होता, तर ‘केएसएच इंटरनॅशनल’ची बाजारात नोंदणी झाली. याशिवाय लघु आणि मध्यम उद्योग (SME) क्षेत्रातही अनेक कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत. सलग दोन दिवसांच्या मोठ्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी आज नफा वसुलीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण – मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १३ कंपन्यांचे शेअर वाढीसह हिरव्या निशाण्यावर बंद झाले, तर उर्वरित १७ कंपन्यांचे शेअर घसरणीसह लाल निशाण्यावर बंद झाले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी केवळ २४ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले आणि उर्वरित २६ कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये ‘आयटीसी’चा शेअर सर्वाधिक १.२७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला, तर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘इन्फोसिस’चा शेअर सर्वाधिक १.२८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. या कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले: सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये आज अल्ट्राटेक सिमेंट (१.२४%), टाटा मोटर्स पीव्ही (१.०९%), टाटा स्टील (१.०३%), एचडीएफसी बँक (०.९१%), एनटीपीसी (०.७८%), पॉवरग्रिड (०.७४%), कोटक महिंद्रा बँक (०.५५%), एचसीएल टेक (०.५३%), हिंदुस्थान युनिलिव्हर (०.४३%), बजाज फायनान्स (०.३५%), महिंद्रा अँड महिंद्रा (०.२५%) आणि बीईएलचे शेअर ०.११ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. या शेअर्सनी लाल निशाण्यावर केला व्यवहार: दुसरीकडे, मंगळवारी भारती एअरटेलचा शेअर ०.९७%, अदानी पोर्ट्स ०.९५%, सनफार्मा ०.९३%, टेक महिंद्रा ०.८८%, एटरनल ०.८४%, ॲक्सिस बँक ०.६८%, मारुती सुझुकी ०.४७%, ट्रेंट ०.४६%, टीसीएस ०.४३%, आयसीआयसीआय बँक ०.३९%, एल अँड टी ०.३०%, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.२९%, एसबीआय ०.२६%, टायटन ०.२६%, बजाज फिनसर्व्ह ०.१२% आणि एशियन पेंट्सचा शेअर ०.०८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.