पुणे जिल्हा | …तरीही पोलीस फिरकलेच नाहीत

उरुळी कांचन, (वार्ताहर) – हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जवळील शिंदवणे टिळेकरवाडी, खामगाव टेक परिसरात मागील दोन दिवसांपासून फिरणार्या ड्रोनमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांपासून रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास दोन ड्रोन दिसून येत होते.
यावेळी शिंदवणे व टिळेकरवाडी येथील काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांना 112 या नंबरवर फोन करून माहिती दिली, मात्र पोलीस त्या ठिकाणी फिरकलेच नसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे. शिंदवणे येथील काही तरुणांनी व नागरिकांनी रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घातली.
लाल, हिरव्या व पांढर्या रंगाच्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये होत्या. बराच काळ हे दोन ड्रोन शिंदवणे येथील परिसरात तरंगत असल्याचे छायाचित्रण काही नागरिकांनी केले. काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाला. हे ड्रोन कोणाचे आहेत, कशासाठी ते उडविले जात आहेत. याची ना पोलिसांना माहिती, ना इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले आहे.
ड्रोनमुळे निर्माण झालेल्या अफवा तसेच नागरिकांमधील भीतीचे वातावरण यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. तसेच जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली होती. मात्र महिती देऊनही पोलीस येत नसल्याने नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदवणे येथे रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास दोन ड्रोन दिसून येत होते. यावेळी मोबाईलमधून व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांना 112 वरती फोन करून माहिती दिली. दोन तास पोलिसांची वाट पहिली, मात्र पोलीस आले नाहीत. – गणेश शितोळे, नागरिक, शिंदवणे





