चिखली – छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज पुतळ्याचे (मूर्ती) शुक्रवारी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी चिखलीत अनावरण होत आहे. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते तसेच संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज हभप पुंडलिक महाराज देहुकर (देहू), ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास (संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज), ह.भ.प.श्री योगिराज महाराज गोसावी (संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज), आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडणार असल्याची माहिती बाळासाहेब मळेकर, समीर मळेकर व हभप राजू महाराज ढोरे यांनी दिली. चिखलीत वाघु साने चौकात शुक्रवारी सकाळी ओम शिवशंभू पेट्रोलियम येथे हा कार्यक्रम सोहळा आयोजित केला आहे. यावेळी वारकरी बंधुंसह परिसरातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी छत्रपती संभाजी महाराज काय बोलणार याची उत्सुकता परिसरात आहे.