नगर -जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, आज बारानवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील स्टेशन रोड, कोठी रस्ता आणि माळीवाडा येथील ब्राह्मणगल्ली येथील व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अर्धे शहर करोनामुळे प्रतिबंधित झाले आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नवीन नऊ रुग्ण सापडले. नगर शहरातील तीन व स्टेशन रोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. कोठी येथील 13 वर्षीय मुलगी आणि ब्राह्मणगल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले.
पाथर्डीतील चेंबूर (मुंबई) येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना करोनाची लागण झाली आहे, तर राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली आहे.
संगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगाव येथे एकजण चेंबूर (मुंबई) येथून लांडेवस्ती
येथे आला असून, तो बोधिता निघाला. ठाणे येथील कळवा येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित निघाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शहरासह अनेक तालुक्यांतील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे करोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर शहरात आगंतुकांची गर्दी झाली. त्यामुळे करोनाबाधितांच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना करोनाने वेढा दिला आहे. संपर्कातील आलेल्या रुग्णांचा अहवाल येणे बाकी असून, त्यांचा काय अहवाल येते, त्याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.