प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. शाळा स्तरावरील शिक्षकांना दिली जाणारे ऑनलाइन व अशैक्षणिक कामे बंद करावी, अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी, नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी, अल्पसंख्याक शाळांना संचमान्यता व नियुक्ती मान्यता याबाबत विशेष सवलत द्यावी, शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील मोर्चा पुणे जिल्हा परिषद कार्यालयमार्गे विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्चाची सांगता होणार आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद करून जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी केले आहे.