मुंबई : राज्यातील प्रमुख आरोग्यसंस्थांपैकी एक असलेल्या सर जे.जे. समूह रुग्णालयाला महिला डॉक्टरकडे केलेल्या अन्यायाची दखल न घेणे महागात पडले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावत सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील प्राध्यापिकेने विभागप्रमुखावर सतत मानसिक त्रास व अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत १० जुलै २०२५ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर रुग्णालय प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नसल्याची नोंद आयोगाने घेतली आहे. आयोगाने या तक्रारीसंदर्भात १८ जुलै आणि २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रुग्णालयाकडून कार्यवाहीचा अहवाल मागवला होता. मात्र रुग्णालयाकडून कोणतीही ठोस माहिती न दिल्याने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीस उपस्थित रुग्णालय प्रतिनिधींकडे तक्रारीसंबंधी कोणतीही सविस्तर माहिती नव्हती, यावर आयोगाने नाराजी व्यक्त केली. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने न घेणे आणि आयोगास आवश्यक माहिती वेळेत न सादर करणे या बाबींचा उल्लेख करीत आयोगाने अधिष्ठाता यांना कारवाईचे कारणे स्पष्ट करणारा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रुग्णालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती संदर्भातील माहिती, तक्रारदार डॉक्टरबाबत घेतलेली दखल, आणि ज्यांच्यावर तक्रार आहे त्या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा जबाबदारी देण्यात आली का? याचा सविस्तर खुलासा आयोगाने मागविला आहे. राज्य महिला आयोगाने स्पष्ट केले आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी संबंधित तक्रारींना विलंब वा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.