जनतेला सरकारची युती रुचली नाही

नगर – राज्यात शिंदे गटाबरोबर जी युती केलेली आहे, ती महाराष्ट्रातील जनतेला रुचलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला भाजप तयार नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
नगर येथे सावता परिषदेचे पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार (दि.4) रोजी पार पडले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आ. प्राजक्त तनपुरे, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राहुल जावळे, जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, भगवान फुकसौंदर, शरद झोडगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी समाजाची नव्याने जनगणना व्हावी, अशी आमची मागणी आहे. समता परिषदेने सुद्धा जात निहाय जनगणना करावी. ही मागणी योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा व विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी म्हणून तर एकत्र लढलो तर निश्चितपणे जास्त जागा येतील असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
कांदा उत्पादकांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये यावर चर्चा झालेली आहे. सरकारने यासंदर्भात थातुरमातुर उत्तर दिलेले आहे. विशेष म्हणजे एक समिती नेमली जाईल, असे त्यांनी घोषणा केली. ज्यावेळी समिती नेमतील तोपर्यंत हा विषय संपलेला असेल व शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे, असेही पाटील यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नसल्याने शेतकरी विरोधी सरकार आहे, असा टोला ही त्यांनी लगावला.
तसेच राज्याच्या जडणघडणीत माळी समाजाचे योगदान मोठे आहे. ओबीसी समाजाचे जातीनिहाय जनगणना व्हावी, ही माळी समाज्याची मागणी आहे. ती मागणी सरकार सत्तेवर आल्यावर राष्ट्रवादी पक्ष नक्कीच करेल. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






