Ashadhi Wari : माउलींच्या पालखीसाठी शुद्ध चांदीचा अत्याधुनिक रथ; केआरए ज्वेलर्सची निर्मिती
Ashadhi Wari : वजन फक्त २.८ टन; १० सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा शुद्ध चांदीचा रथ साकारण्यात आला आहे. केआरए (कृष्णा राजाराम अष्टेकर) ज्वेलर्सने तयार केलेला हा रथ ८ जुलै रोजी आळंदी येथून होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यात प्रथमच सहभागी होणार आहे. पारंपरिक सौंदर्य कायम राखत रथाचे वजन लक्षणीयरीत्या कमी करण्यात आल्याने पालखी ओढणाऱ्या बैलांना अधिक सुलभता मिळणार आहे.
केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी सांगितले की, रथाची मजबुती अबाधित ठेवत त्याचे वजन कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी अत्याधुनिक सिल्व्हर इलेक्ट्रोप्लेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. इपॉक्सी पॉलीस्टर रेझिन आणि कार्बन फायबर बेसच्या साहाय्याने रथाची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे रथ लोखंडाइतका मजबूत, तर ॲल्युमिनियमप्रमाणे हलका झाला आहे. या नव्या रथाचे एकूण वजन सुमारे २.८ टन आहे.
रथाच्या निर्मितीत आळंदी देवस्थानातील शुभचिन्हांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. रथाच्या अग्रभागी माऊलींची मूर्ती, तसेच सूर्य, गरुड, हनुमान आणि जय-विजय यांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. रथावरील पारंपरिक नक्षीकाम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले असून त्यामुळे रथाला धार्मिक परंपरेशी सुसंगत आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
रथाच्या सुरक्षेसाठीही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीवर आणि रथाच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी रथावर १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून जीपीएस प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. परंपरेचे जतन करत अत्याधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून साकारलेला हा शुद्ध चांदीचा रथ यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.





