सोलापूर – सोलापुरातील लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या 2020 आणि 2021 सालातील राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. 2021 सालात सुरेंद्र दरेकर यांच्या अस्तीसूत्र या लघु कादंबरीस, किरण गुरव यांच्या क्षुधाशांती भुवन या कथासंग्रहास तसेच जयप्रकाश सावंत यांच्या पुस्तकनाद या ललित संग्रहास राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच विलास खोले यांच्या नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह या त्यांच्या कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान, 2020 सालातील पुरस्कारासाठी अशोक राणे यांच्या सिनेमा पाहणारा माणूस या आत्मचरित्रास, पुरुषोत्तम बेर्डे यांच्या क्लोज एन्काउंटर्स या ललित संग्रहास आणि संतोष जगताप यांच्या विजेने चोरलेले दिवस या कादंबरीची लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच मराठी अभ्यास परिषदेच्या भाषा आणि जीवन या त्रैमासिकासाठी संपादक डॉक्टर आनंद काटीकर यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय डॉ. शिवाजी शिंदे, नंदा खरे, सुहास बहुळकर, सुधीर रसाळ, आनंद कुंभार, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुख, सई परांजपे, गोपाळराव देशमुख, मकरंद साठे, गणेश मतकरी, मंगेश काळे, राजीव नाईक, ऋषिकेश गुप्ते, प्रफुल्ल शिलेदार, प्राध्यापक द. तू. पाटील, शर्मिला फडके, विश्राम गुप्ते आणि मराठी भाषा आणि संशोधन मंडळाच्या मराठी संशोधन पत्रिका यांना लोकमंगल परिवार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 19 डिसेंबर रोजी या साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.