#हिवाळीअधिवेशन2022 : कर्जत-जामखेडमध्ये लवकरच एमआयडीसी – उद्योगमंत्री सामंत

नागपूर : कर्जत – जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कार्यवाही करू, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री सामंत उत्तर देत होते.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 293 औद्योगिक क्षेत्र विकसित केली असून महामंडळामार्फत विविध आकाराचे 86 हजार 417 भूखंड आखण्यात आले आहेत. यापैकी 62 हजार 317 औद्योगिक, 6 हजार 144 व्यापारी व 4 हजार 57 निवासी भूखंडांचे वाटप करण्यात आले आहेत.
माझ्या मतदारसंघातील #MIDC च्या विषयावर लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं. MIDC बाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २०२३च्या सुरवातीला इथं शासनाच्या माध्यमातून उद्योग आणले जातील, असं उद्योगमंत्री @samant_uday साहेब यांनी आश्वासित केलं.https://t.co/LsXRjvkPx7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 26, 2022
मौजे पाटेगाव व खंडाळा येथील औद्योगिक वसाहतींबाबत उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
याबाबत राज्य शासन सकारात्मक असून राज्यात विविध उद्योग यावेत, हीच शासनाची भूमिका आहे. मात्र, कायदेशीर तरतुदी तपासून निर्णय घेणार असल्याचे, मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनी सहभाग घेतला.





