संगणक टायपिंग परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इंग्रजी टायपिंगची 30 व 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा 4 ते 10 जुलैदरम्यान होणार आहे. मराठी व हिंदी टायपिंगची 30 व 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार आहे. टायपिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा अर्ज मुदतीत भरणे आवश्‍यक आहे. नियमत शुल्कासह अर्ज भरण्याकरीता येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 1 ते 7 मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरावे लागणार आहेत. 8 ते 14 मे दरम्यान अतिविलंब शुल्कासह संस्थांना अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.

यंदापासून मुदतीत अर्ज न भरणाऱ्या संस्थांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. अर्जातील दुरुस्त्यांसाठीही दंड आकारणी होणार आहे. सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीसाठी नोंदणी शुल्क म्हणून संस्थांना हजार रुपये भरावे लागणार आहे.

टायपिंगची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा शासनमान्य शाळेतून किमान आठवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असणे आवश्‍यक आहे. शासनमान्य संगणक टायपिंग संस्थेत आठवड्यात किमान चार तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी 4 महिने किंवा 80 घड्याळी तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे, असे परीक्षेच्या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.