Vinod Mehra : बालकलाकार म्हणून एन्ट्री, पुढे बनला लोकप्रिय अभिनेता; रेखासोबत जोडलं नाव, कोण आहे हा अभिनेता?
Vinod Mehra : विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी अमृतसर येथे झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी ‘अदाल-ए-जहांगीर’ या १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले.

Vinod Mehra : हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणे आणि प्रतिभावान अभिनेते म्हणून दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांच्याकडे पाहिले जाते. या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत: वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले. बालकलाकार म्हणून सुरू झालेला विनोद यांचा प्रवास पुढे चित्रपटातील मुख्य अभिनेता म्हणून बहरला. मात्र, यशाच्या शिखरावर असताना या उमद्या कलाकारांनी वयाच्या ४५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
७० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक कलाकराच्या वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रसिद्धीच्या झोतात असताना विनोद मेहरा त्यांच्या खाजगी आयुष्यातील विविध घटनांमुळे कायम चर्चेत असायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील विविध घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख्याच होत्या.
बालकलाकार म्हणून केली अभिनयाची सुरुवात
विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी अमृतसर येथे झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी ‘अदाल-ए-जहांगीर’ या १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. बालकलाकार म्हणून त्यांनी ‘पतित पावन’, ‘रंग दुनिया रंगीली’, ‘बाल योगी उपमन्यू’, ‘रागिणी’, ‘बेवकूफ’ आणि ‘अंगुलीमाल’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या.
‘रागिणी’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ गायक-अभिनेते किशोर कुमार यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. लहान वयातच विविध चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांना अभिनयाचा चांगला अनुभव मिळाला. मात्र, चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यापूर्वी त्यांनी वेगळ्या क्षेत्रातही नशीब आजमावले. १९६५ मध्ये त्यांनी एका खासगी कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते.
राजेश खन्नांकडून एका गुणाने हुकले यश
विनोद मेहरा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट’. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यातील अभिनयकौशल्य ओळखून त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले होते. ‘युनायटेड प्रोड्युसर्स’ आणि ‘फिल्मफेअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील दहा हजारांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत पुढे हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले गेलेले राजेश खन्ना यांनीही भाग घेतला होता. त्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर विनोद मेहरा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे, विनोद मेहरा हे राजेश खन्ना यांच्यापेक्षा केवळ एका गुणाने मागे राहिल्याची खास आठवण आजही चर्चेत आहे.
१९७१ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण
विनोद मेहरा यांनी १९७१ मध्ये ‘एक थी रीटा’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची त्यांची विलक्षण जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांच्यातील कलाकार घडत गेला. पदापर्णातील यशस्वी चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्याने ‘बेमिसाल’, ‘अनुराग’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खुद्दार’, ‘घर’, ‘अमर प्रेम’, ‘जुरमाना’, ‘लाल पत्थर’, ‘जानी दुश्मन’ आणि ‘नागिन’ यांसारख्या चित्रपटात काम केले.
तीन विवाह आणि वैयक्तिक आयुष्याची चर्चा
विनोद मेहरा यांच्या खाजगी आयुष्यातील घटनांची आजही चर्चा होते. १९७४ मध्ये त्यांचा पहिला विवाह मीना ब्रोका यांच्याशी झाला. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि १९७८ मध्ये दोघे विभक्त झाले. यानंतर १९८० मध्ये त्यांनी अभिनेत्री बिंदिया गोस्वामी यांच्याशी विवाह केला. मात्र, या नात्यातही दुरावा निर्माण झाला. १९८४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९८८ मध्ये त्यांनी किरण मेहरा यांच्याशी तिसरा विवाह केला. या दाम्पत्याला रोहन मेहरा हा मुलगा आणि सोनिया मेहरा ही मुलगी झाली. मात्र, संसाराची नव्याने सुरुवात केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच विनोद मेहरा यांचे निधन झाले. ३० ऑक्टोबर १९९० रोजी त्यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
रेखा यांच्यासोबतच्या कथित प्रेमसंबंधांची चर्चा
विनोद मेहरा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या कथित प्रेमसंबंधांबाबतही अनेक वर्षे चर्चा होत राहिली. दोघांनी ‘घर’, ‘खून पसीना’, ‘कर्तव्य’, ‘बिंदिया चमकेगी’, ‘साजन की सहेली’, ‘प्यार की जीत’ आणि ‘लॉकेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा त्यावेळी मनोरंजन विश्वात रंगत असायच्या.
Donald Trump: ट्रम्प यांच्या एका होकाराची प्रतीक्षा! इराणवर अमेरिकी हल्ल्याचे काउंटडाउन सुरू?






