Yash Chopra : असिस्टेंट म्हणून करिअरची सुरुवात; अमिताभ यांना मिळाली ‘अँग्री यंग मॅन’ ओळख, शाहरुखला बनवलं रोमँटिक हिरो, यशराज यांचा प्रवास
Yash Chopra : अमिताभ बच्चन यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अॅक्शन आणि ड्रामा चित्रपटही केले आणि हिंदी सिनेमाला अनेक संस्मरणीय चित्रपट दिले.

Yash Chopra : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमाची व्याख्या बदलण्याचे श्रेय दिवंगत ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांना दिले जाते. रोमँटिक चित्रपटांना भव्यता, भावनिक खोली आणि नयनरम्य दृश्यवैभव देत त्यांनी हिंदी सिनेमावर स्वतःची वेगळी छाप उमटवली. मात्र, केवळ रोमँटिक चित्रपटांपुरतेच त्यांचे योगदान मर्यादित नव्हते. अमिताभ बच्चन यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अॅक्शन आणि ड्रामा चित्रपटही केले आणि हिंदी सिनेमाला अनेक संस्मरणीय चित्रपट दिले.
यश चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ रोजी लाहोर येथे झाला. आठ भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे वडील लाला विलायती राज चोप्रा हे ब्रिटिश पंजाब प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) लेखापाल म्हणून कार्यरत होते. यश चोप्रा यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची आठवण होत आहे.
मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली सिनेसृष्टीत प्रवेश
यश चोप्रा यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात त्यांचे मोठे बंधू आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सुरुवातीला त्यांनी बी. आर. चोप्रा यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या काळात त्यांनी चित्रपटनिर्मितीचे बारकावे आत्मसात केले.
१९५९ मध्ये ‘धूल का फूल’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात राजेंद्र कुमार आणि माला सिन्हा यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाची वेगळी शैली दाखवून दिली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
यशराज फिल्म्सची स्थापना
१९७१ मध्ये यश चोप्रा यांनी यश राज फिल्म्स (YRF) या निर्मिती संस्थेची स्थापना केली. पुढील काळात या संस्थेने हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यश चोप्रा यांनी ‘वक्त’, ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘वीर-झारा’ यांसारखे गाजलेले चित्रपट दिले. प्रेम, नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य ठरले.
अमिताभ यांची ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमा आणि शाहरुखचा रोमँटिक अंदाज
यश चोप्रा यांच्या चित्रपटांनी अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीलाही नवी दिशा दिली. त्यांच्या चित्रपटांमधून अमिताभ बच्चन यांची ‘अँग्री यंग मॅन’ ही प्रतिमा अधिक ठळक झाली. ‘दीवार’ आणि ‘त्रिशूल’ यांसारख्या चित्रपटांनी हिंदी सिनेमातील अॅक्शन आणि ड्रामाला नवा आयाम दिला.
दुसरीकडे, शाहरुख खानच्या रोमँटिक नायकाच्या प्रतिमेलाही यश चोप्रा यांनी मोठी उंची दिली. ‘डर’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘वीर-झारा’ यांसारख्या चित्रपटांमधून शाहरुख खानची रोमँटिक हिरो म्हणून ओळख अधिक मजबूत झाली.
यश चोप्रांचा वारसा कायम
२१ ऑक्टोबर २०१२ रोजी यश चोप्रा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी यशराज फिल्म्सची धुरा सांभाळत आहेत. तर त्यांचा दुसरा मुलगा उदय चोप्रा यांनी अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.
प्रेमकथांना भव्यता, भावना आणि वेगळे दृश्यवैभव देणारे यश चोप्रा आजही त्यांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हिंदी सिनेमातील रोमँटिक चित्रपटांची चर्चा होताना यश चोप्रा यांचे नाव आजही आवर्जून घेतले जाते आणि पुढील पिढ्यांमध्येही त्यांचा सिनेमॅटिक वारसा कायम राहणार आहे.
Pimpri-Chinchwad: गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमधून लाखो नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास







