लाख कालवा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा – ॲड. सादीक शिलेदार

नेवासा – नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक, साईनाथनगर, पाचेगाव आणि पुनतगाव या गावांतील शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून, कमी पर्जन्यमानामुळे हा भाग दुष्काळी पट्ट्यात आहे. येथील शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या लाख कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नेवासा तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ॲड. सादीक शिलेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ॲड. शिलेदार यांनी सांगितले की, १८६७ मध्ये बांधलेल्या लाख बंधाऱ्याची साठवण क्षमता २५ दशलक्ष घनफूट आणि वहन क्षमता ८० क्युसेस आहे. ३९३ मीटर लांबीचा हा बंधारा ६६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन पुरवतो. याच्या डाव्या तीरावरील ३७ किमी लांबीच्या कालव्यामुळे श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील अनेक गावांना खरीप-रब्बी हंगामात पाणीपुरवठा होत होता. मात्र, गाळ न काढल्याने आणि अतिक्रमणामुळे कालवा खराब झाला आहे. या भागात १००-१५० मिमी पर्जन्यमानामुळे नेहमी दुष्काळी परिस्थिती आहे.
कालवा दुरुस्त झाल्यास नेवासा तालुक्यातील ३७६२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, भूजल पातळी वाढेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल. यामुळे रोजगारनिर्मिती होऊन भाग समृद्ध होईल. ॲड. शिलेदार यांनी कालवा दुरुस्तीला त्वरित मंजुरी देऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, लाभार्थी शेतकऱ्यांसह जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

