पिंपरी | नवीन इमारतीत तलाठी कार्यालय सुरू करा
वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – वडगाव मावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी चावडी चौकात नव्याने तलाठी कार्यालय बांधण्यात आले आहे. हे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी वडगाव शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना वडगाव शहर भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, पक्षाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते रामचंद्र बवरे, गटनेते दिनेश ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
वडगाव तलाठी कार्यालय हे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने हॉटेल विवोद्री शेजारी या ठिकाणी सुरू आहे. गावातील खातेदार, नागरिक, ७/१२ उतारे, विद्यार्थ्यांना उत्त्पन्नाचे दाखले अशा शासकीय कामाकरिता कामगार तलाठी कार्यालयात जावे लागते.
सध्या सुरू असलेले तलाठी कार्यालय हे जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गच्या पलीकडे आहे. भरधाव वेगात वाहने असल्याने रस्ता ओलांडून पलिकडे जाण धोक्याचे आहे. यापूर्वी या महामार्ग मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडणे धोकादायक आहे.
नुतन इमारतीचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ते त्वरित पुर्ण करण्यात यावे. नागरिक व विद्यार्थी यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वडगाव तलाठी कार्यालय नुतन इमारतीमध्ये त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.





