आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

पुणे – महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या जवळ आल्या आहेत. निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल, तो होईल, प्रत्येक प्रभागात तयारी करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले. शहरातील बारामती हॉस्टेल येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, की पुणे जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. पिंपरी- चिंचवड महापालिकेत 27 वर्षे, तर पुणे महापालिकेतही 10 वर्षे सत्ता होती. पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीकडे अधिक लक्ष द्यावे, तसेच शहराची विधानसभानिहाय, प्रभागनिहाय नवीन कार्यकारिणी करताना सर्वसमावेश अशा लोकांना पदाधिकारी नेमा. येत्या 15 आॉगस्टपर्यंत पदाधिकारी नियुक्तीची मुदत देण्यात आली आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर विचारले असता, पवार म्हणाले, की याबाबत राज्य स्तरावर निर्णय होईल.
दोघांची राजकीय भूमिका वेगळी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते असून, आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. दोघांची राजकीय भूमिका वेगवेगळी आहे, हे जगजाहीर आहे.
सध्या त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, यावर तेच बोलतील. अनेक वर्षे झाले ते प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. नव्या लोकांना संधी द्यायची असेल, म्हणून ते बाजूला झाले असतील. मात्र, राजीनामा का दिला, हे विचारायचा मला अधिकार नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात भेटले, तर त्यांना नक्की कारण विचारू.





