कराड – करोनामुळे शहरातील अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने गेले तीन महिने बंद केले होते. ते पूर्ववत सुरू करावेत. ग्रामीण भागात रुग्ण तपासणीसाठी जाणाऱ्या डॉक्टरांनी सेवा पुन्हा सुरू करावी, अशा सूचना शहरस्तरीय सुकाणू समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, नगरसेवक हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, विनायक पावसकर, फारुक पटवेकर, सुहास जगताप, विद्या पावसकर, अंजली कुंभार, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव चव्हाण, डॉक्टर, नागरी आरोग्य केंद्राचे अधिकारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
वाकडे म्हणाले, लॉकडाऊनमधील अनेक नियम शिथिल झाल्याने तालुक्यातील लोकांचा लोंढा कराड शहरात येत आहे. करोनाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील एखादा रुग्ण कराड शहरात आल्यास त्याच्यावर त्याच पद्धतीने उपचार करावेत. लोकांमध्ये करोनाबाबत असलेली भीती कमी करण्यासाठी डॉक्टरांनी समाजमाध्यमांमधून आवाहन करावे.
कोव्हिडची लक्षणे व साधी सर्दी, ताप याबाबत जागृती करावी. ग्रामीण भागात जाणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे कराड शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. बी. आर. पाटील, डांगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली.