अवघ्या 4 महिन्यांच्या कामासाठी 800 कोटी रुपये पगार, ऑफिसला जाण्यासाठी खाजगी विमान, जाणून घ्या कोण आहे ‘ही’ व्यक्ती?

Starbucks CEO Brian Niccol Salary: कोणत्याही कंपनीच्या सीईओचा पगार हा लाखो-कोटी रुपयांमध्ये असतो. मात्र, एका सीईओला कंपनीमध्ये जॉइन झाल्यापासून अवघ्या 4 महिन्यात तब्बल 800 कोटी रुपये पगार मिळाला आहे. हे सीईओ आहेत ब्रायन निकोल. सप्टेंबर 2024 मध्ये स्टारबक्सने त्यांची कंपनीच्या चेअरमन आणि सीईओपदी नियुक्ती केली होती. तेव्हापासून 4 महिन्यात त्यांना 96 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 796.8 कोटी रुपये पगार मिळाला आहे.
Apple चे प्रमुख टिम कुक आणि Google चे प्रमुख सुंदर पिचाई यांना मागील वर्षभरात जवळपास 75 मिलियन डॉलर्स एवढा पगार मिळाला. म्हणजेच, अॅपल आणि गुगलच्या सीईओंपेक्षा अधिक पगार केवळ 4 महिन्यात ब्रायन निकोल यांना मिळाला आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये स्टारबक्सने लक्ष्मण नरसिम्हन यांना हटवून ब्रायन निकोल यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर एका महिन्यातच त्यांना साइन ऑन बोनस स्वरुपात 5 मिलियन डॉलर पगार मिळाला होता. मागील 4 महिन्यात कामासाठी त्यांना जवळपास 800 कोटी रुपये पगार मिळाला आहे. यातील जवळपास 94 टक्के रक्कम ही स्टॉक अॅवॉर्ड्स स्वरुपात मिळाली आहे.
निकोल यांचा आता अमेरिकेतील टॉप-20 पगार असलेल्या सीईओंमध्ये समावेश झाला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, त्यांचा वार्षिक पगार हा जवळपास 113 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास सुमारे 938 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यांच्या पॅकेजमध्ये Chipotle Mexican Grill Inc शी संबंधित इक्विटी फायद्यांचा देखील समावेश आहे.
एवढेच नाही तर ब्रायन निकोल हे ऑफिसला जाण्यासाठी चक्क खाजगी विमानाचा वापर करतात. स्टारबक्सचे मुख्यालय सिएटलमध्ये आहेत. तर निकोल कॅलिफोर्नियामध्ये राहतात. या दोन्ही शहरांमधील अंतर जवळपास 1600 किमी आहे. त्यामुळे आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला जाण्यासाठी थेट खाजगी विमानाचा वापर करतात.


