एसटी प्रवास सवलत महिला सक्षमीकरणाची उमदी भेट

सातारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास करण्याची केलेली घोषणा कौतुकास पात्र ठरली आहे. हे महिला सक्षमीकरणाचे हे नवे पाऊल असल्याच्या प्रतिक्रिया महिलांमधून व्यक्त झाल्या आहेत.
महिलांसाठी योग्य निर्णय
शिंदे फडणवीस शासनाने महिलांना एसटी प्रवास 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांच्या प्रवाशाच्या खर्चामध्ये बरीच काटकसर होणार आहे. ही काटकसर महिलांना त्यांच्या संसाराम उपयोगी ठरणारी आहे. आजची महिला ही आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी ती प्रवास करते. या प्रवासासाठी तिला पैसे खर्च करावे लागतात. त्याची बचत होणार असेल तर तिच्या आर्थिक सक्षमतेला हा मोठा हातभार लागणार आहे.
सिद्धी पवार (माजी बांधकाम सभापती, सातारा)
ग्रामीण भागातील महिलांसाठी चांगला निर्णय
एसटी प्रवास ही योजना महिलांसाठी जाहीर करून महाराष्ट्रातील तमाम भगिनींना महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी गोड भेटच दिली आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो एखाद्या महिलेचे साताऱ्यात येणे आणि माघारी जाणे हा दुहेरी प्रवास अल्प खर्चात होणार असेल तर तो निर्णय निश्चित वाखाणण्याजोगा आहे. सवलतीचा प्रवास हा महिलांच्या आर्थिक उन्नतीचा एक राजमार्ग ठरावा ही अपेक्षा.
डॉ. अरुणा बर्गे (सामाजिक कार्यकर्त्या)
महिलांसाठी क्रांतिकारी निर्णय
पंचामृत योजनेतील अनेक योजना कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणाला चालना देणारी एसटी प्रवास सवलत योग्य ठरावी. महिलांना कामानिमित्त एका टोकापासून दुसऱ्या टोकाला प्रवास करावा लागतो. आजची महिला व्यावसायिक आहे. अल्पबचत चळवळ चालवणारी आहे, कष्टकरी महिला कुटुंब चालवणारी आहे. त्याचबरोबर अनेक रचनात्मक कामांमध्ये तिचा हिरीरीने सहभाग असतो. तिच्या स्वातंत्र्याला अशा सवलतीच्या प्रवासाची भेट मिळत असेल तर तो एक क्रांतिकारी निर्णय ठरू शकतो.
ऍड. अरुणा बंडगर-पाटील (सातारा)
महिलांसाठी आनंददायी योजना
महिलांनी घरामध्ये थांबून कुटुंब सांभाळण्याचा पारंपरिक बाज आधुनिक युगामध्ये बदललेला आहे. महिला बराच काळ प्रवास करतात आणि त्या माध्यमातून अनेक आर्थिक उलाढाली सुरू असतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रवासातील बचत महिलांसाठी आनंददायी योजना आणि आर्थिक उन्नतीचा वेगळा मार्ग ठरावी.
पल्लवी दाढे (सातारा)





