पुणे जिल्हा | शिरूरमध्ये एसटी प्रवाशांचा खोळंबा

शिरूर (वार्ताहर) – राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे एस. टी कर्मचार्यांना वेतन देणे, महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खासगीकरण, सुधारीत जाचक कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
शिरूर बस स्थानकातील 13 कामगार संघटनांनी राज्यभरात पुकारलेल्या संपात सहभागी होऊन शिरूर एसटी बसस्थानकात धरणे आंदोलन केले आहे.
राज्य शासनाने याबाबत दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे एसटी कामगार संतप्त झाले आहेत. या आंदोलनात अध्यक्ष सुनिल जगदाळे, सुनिल जगताप, कैलास सूर्यवंशी, संभाजी थोरात, सुभाष ढावरे, सुनिल पवार व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळपासून शिरूर एसटी बस स्थानकातून एकही एसटी बस बाहेर न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे व प्रवाशांचे हाल झाले. एसटी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
शिरूर एसटी बस स्थानकातून रोजच्या नऊशे ते हजार एसटी बस यांची ये -जा असते. प्रवसीमोठ्या संख्येने एसटी बस ने प्रवास करतात. पण बंदमुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले.





