St. Joseph International School: शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित ‘आनंद मेळा’ (फनफेअर) उत्साह, रंगत आणि कल्पकतेच्या वातावरणात संपन्न झाला. दि. २४ एप्रिल रोजी इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाने शाळेचा परिसर उत्सवमय झाला होता. शाळेचे अध्यक्ष अनिल पायस तसेच सचिव व मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. मेळ्यात विद्यार्थ्यांनी उभारलेले विविध स्टॉल्स आकर्षणाचे केंद्र ठरले. चटकदार खाद्यपदार्थ, आइस्क्रीम, बर्फगोळे, शीतपेये यांसोबतच स्टेशनरी, ज्वेलरी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंना मोठी मागणी होती. तसेच मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांसह भाजीपाल्याची विक्रीही करण्यात आली. मनोरंजक खेळ व बौद्धिक उपक्रमांनी मेळ्याला वेगळीच रंगत दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विक्री, नियोजन, ग्राहकांशी संवाद, विपणन व आर्थिक व्यवहार यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. ‘व्यावसायिक मार्गदर्शन’ या संकल्पनेवर आधारित या मेळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, अचानक झालेल्या पावसामुळे कार्यक्रमात काही काळ व्यत्यय आला; मात्र तत्परतेने मेळा शाळेच्या आतील परिसरात हलविण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांचा उत्साह अबाधित राहिला. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या मेळ्याला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारा हा ‘आनंद मेळा’ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.