ST employees strike : निलंबनाच्या भीतीने संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बुलढाणा – राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहे. ऐन दिवाळी सणात पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईचा काही संपकारी कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे. असे असताना बुलढाण्यातील संपावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने निलंबनाच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
याआधी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पुर्ण झाल्या नाहीत शिवाय यावर काही तोडगा सुद्धा निघाला नाही. असे असताना एसटी कर्मचारी मात्र आपल्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहील यावर ठाम आहेत.





