ST Bus Ticket Hike – उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटीने गावाला किंवा पर्यटनाला जाण्याचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी तिकीट दरात १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार देखील मोजावा लागणार आहे. त्यामुळे यंदा एसटीचा प्रवास म्हणजे उन्हाचा चटका आणि खिशाला फटका, अशी अवस्था होणार आहे. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी सुरू होताच दरवर्षी पर्यटनासाठी आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर यांसारख्या प्रमुख आगारांतून राज्याच्या कानाकोपऱ्यात गाड्या धावतात. त्यामुळे या आगारामध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असून, यंदा २५ एप्रिलनंतर शाळांच्या सुट्ट्या सुरू होणार असल्यामुळे त्यानंतर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. एसटी बस स्थानक दरम्यान, महागाई आणि इंधन टंचाईच्या काळात आधीच सामान्य जनता होरपळत असताना, एसटी महामंडळाने ही भाडेवाढ लागू केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ही दरवाढ विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांच्या बजेटवर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. बदल दोनच महिन्यांसाठी… या निर्णयामध्ये एसटी महामंडळाने हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, जनशिवनेरी, शयनयान आणि ई-बस (शिवाई) यांना या दरवाढीतून वगळले आहे. मात्र, ज्या प्रवाशांनी उन्हाळी हंगामासाठी आधीच आगाऊ आरक्षण केले आहे, त्यांना प्रवासादरम्यान भाड्यातील फरकाची रक्कम कंडक्टरकडे जमा करावी लागणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात महामंडळाने दरवाढ टाळली होती. मात्र, आता उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत ही वाढ केल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. १५ जूननंतर हे दर पुन्हा पूर्ववत होतील. दरवाढ : १० टक्के (हंगामी) + २ रुपये स्वच्छता अधिभार. -कालावधी : १५ एप्रिल ते १५ जून २०२४. -या गाड्या महागणार : साध्या (लाल परी) आणि निमआराम गाड्या. -येथे दरवाढ नाही : शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, शयनयान आणि ई-बस. -जादा रक्कम : आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरकाची रक्कम द्यावी लागेल.