प्रभात वृत्तसेवा पुणे – दिवाळी सुट्टया संपल्यानंतर शाळांमध्ये सहलींचे नियोजन सुरू झाले असून, सहलींसाठी एसटी महामंडळाच्या बसला मोठी मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सहलीसाठी एसटी विभाग नवीन बस उपलब्ध करून देणार असल्याने मुलांना स्वच्छ, आनंदी आणि नव्या कोऱ्या बसमधून सहलीचा आनंद घेता येणार आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा, महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बस उपलब्ध करून देणार आहे. तसेच एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलत नेहमीप्रमाणे मिळणार आहे. यंदा राज्यातील २५१ आगारांमधून ८०० ते १ हजार बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना राज्यातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे. सहल हा शालेय अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा उपक्रम असतो. यंदा एसटीकडील नवीन बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात दररोज किमान एक हजार बस सहलीसाठी दिल्या जातील असे सांगण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शाळा, महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९ हजार ६२४ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाही प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांना दररोज एसटी बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आगारप्रमुख, स्थानक प्रमुख स्वतः शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीसाठी बस बुकिंगबाबत आवाहन करीत आहेत. “दिवाळीनंतर शालेय सहलीसाठी एसटी बसला मागणी जास्त असते. यंदा सहलीसाठी नव्या लालपरी देण्यात येणार असून, तसे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. नवीन गाड्यांमुळे प्रवासातील आनंद द्विगुणित होणार आहे.” – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग.