ST bus accident – पुणे-कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील गुंजाळवाडीजवळ रविवार, दि.१७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात बस चालक व एक प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, २५ जण जखमी झाले आहेत. भिवंडी डेपोची MH14BT4023 बस शेवगाव-कल्याण-भिवंडी मार्गावरील एसटी बस कल्याणच्या दिशेने जाताना अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिची चाके वर झाली. रविवारी सुट्टी असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक केबिनमध्ये अडकला होता. परिस्थिती गंभीर असल्याने घटनास्थळी जेसीबी आणि क्रेन मागवण्यात आली. जखमी चालकासह इतर प्रवाशांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचा क्रमांक महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात जखमी व मृतांची नावे उशिरापर्यंत समजली नव्हती. साईट पट्ट्या भरल्या नाही वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, स्पीड लिमिट बोर्डस लावलेले नसल्याचे दिसून येते. तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज आहे परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष केले असे सामाजिक कार्यकर्ते रामा गुंजाळ यांनी सांगितले. रस्त्याचे सर्व व्यवस्थित काम करण्याची मागणी मयुर गुंजाळ, सचिन गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, किसन बोरचटे, सरपंच नयना गुंजाळ यांनी केली आहे.