SSC Result 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदा पिंपरी-चिंचवड शहराचा एकूण निकाल ९७.३१ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अर्धा टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. यंदा शहरातून एकूण १९ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये १० हजार ३०१ मुलांचा आणि ९ हजार ६६२ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेला १० हजार २८२ मुले आणि ९ हजार ६३० मुली असे मिळून १९ हजार ९१२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ हजार ९३० मुले आणि ९ हजार ४४८ मुली असे एकूण १९ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाच्या आकडेवारीत यंदाही मुलींचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. मुलांचा उत्तीर्ण टक्का ९६.५७ इतका राहिला असून मुलींचा उत्तीर्ण टक्का तब्बल ९८.११ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सलग आणखी एका वर्षी मुलींनी गुणवत्तेत आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील ९८ शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपला सीट नंबर टाकून निकाल पाहिला. निकाल लागताच विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींना मिठ्या मारत आनंद साजरा केला. काही प्रमाणात निकालात घसरण झाली असली तरी विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे शहराचा निकाल समाधानकारक मानला जात आहे. दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे.