पुणे – शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून पोलिसांना मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पोलीस खात्यातील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) कर्मचारी व होमगार्ड यांच्या मोफत बस प्रवासावर पीएमपीने बंदी आणली आहे. याबाबत त्यांच्या मोफत बस प्रवासासाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळत नसल्याचे कारण पीएमपीने दिले आहे.
पीएमपी बसने काही शासकीय अधिकारी, कर्मचारी, पीएमपीतील कर्मचारी, सैन्यातील जवान व अन्य काही जणांना बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. पोलीस दलालाही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पोलीस खात्यातीलच राज्य राखीव दल व होमगार्ड यांना बसप्रवास मोफत नसल्याचे पीएमपीकडून नुकताच आदेश काढला आहे. मात्र, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक ग्रामीण, पोलीस अधीक्षक लोहमार्ग यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्यास परवानगी दिले आहे.
राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि होमगार्ड दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मोफत प्रवासासाठी आम्हाला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे त्यांचा मोफत बस प्रवास बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात, पोलीस खात्याने अनुदानाची प्रक्रिया सुरू केल्यास मोफत प्रवास सुरू करण्यात येईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.