कराड दक्षिण, उत्तर व पाटण या तीन मतदारसंघातूनच एक लाखांहून अधिक मताधिक्य
संदीप राक्षे
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांना दिल्लीला पाठवण्यात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाने निर्णायक भूमिका बजावत मोठा वाटा उचलला आहे. कराड उत्तरमधून श्रीनिवास पाटील यांना सर्वाधिक 50879 मताधिक्क्य मिळाले. कराड उत्तरसह, कराड दक्षिण, पाटण व वाई या चार मतदारसंघांतून मिळालेल्या मताधिक्क्याने पाटील यांचा विजय सोपा केला. पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे उदयनराजे भोसले यांना सातारा व कोरेगाव मतदारसंघातून 51 हजार 719 मताधिक्य मिळाले. मात्र, हे मताधिक्य उदयनराजेंना दिल्लीला पोहचविण्यामध्ये अपुरे पडले.
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष होते. उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांच्या लढतीचे “कॉलर विरुद्ध मिशी’ तर सोशल मीडियावर “कॉलर विरुद्ध स्कॉलर’ असे वर्णन करण्यात आले होते. श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा 87 हजार 717 मतांनी पराभव केला. या चुरशीच्या लढतीत पाटील यांना सहा लाख 36 हजार 620 मते तर उदयनराजे भोसले यांना पाच लाख 48 हजार 903 मते मिळाली. सहा विधानसभा मतदारसंघांची आकडेवारी लक्षात घेता कराड उत्तरने पाटील यांना 50,879 मतांची सर्वाधिक आघाडी देत निर्णायक भूमिका बजावली. उत्तरने श्रीनिवास पाटील यांना एक लाख 14 हजार 641 मते तर उदयनराजे यांना 63 हजार 762 मतांचा कौल दिला.
कराड दक्षिणमध्ये पाटील यांना 31 हजार 849 मतांची आघाडी मिळाली. येथे पाटील यांना एक लाख 13 हजार 550 मते तर उदयनराजे यांना 81,701 मते मिळाली. पाटण मतदारसंघाने श्रीनिवास पाटील यांना 27 हजार 859 मताधिक्य दिले. पाटील यांना या मतदारसंघात एक लाख 12 हजार 348 मते मिळाली. तर उदयनराजे यांना 84 हजार 859 मते मिळाली. वाई विधानसभा मतदारसंघात पाटील यांना सर्वाधिक एक लाख 22 हजार 707 मतदान झाले. मात्र पाटील यांना येथून 27 हजार 63 एवढे मताधिक्य मिळाले. या चारही मतदारसंघातून पाटील यांना चार लाख 63 हजार 426 मते तर एक लाख 37 हजार 550 एवढे मताधिक्क्य मिळाले.
सातारा व कोरेगाव या दोन मतदारसंघातील मतदारांनी उदयनराजे भोसले यांना झुकते माप दिले. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना एक लाख 18 हजार 898 मते मिळाली. तर पाटील यांना 72 हजार 864 मतांवर समाधान मानावे लागले. येथे उदयनराजे यांना 46 हजार 34 मतांची आघाडी मिळाली. साताऱ्यात विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापेक्षा एक हजार 564 मतांचा जादा कौल उदयनराजे यांना मतदारांनी दिला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना एक लाख एक हजार 638 मते तर श्रीनिवास पाटील यांना 95993 मते मिळाली. या मतदारसंघात उदयनराजे यांना 5685 मताधिक्य मिळाले. सातारा व कोरेगाव या दोन मतदारसंघातून 51 हजार 719 मतांची आघाडी उदयनराजे यांनी घेतली. मात्र त्यामुळे कराड दक्षिण, उत्तर, पाटण व वाई या चार मतदारसंघाचे एक लाख 37 हजाराचे पाटील यांचे मताधिक्य उदयनराजे यांना तुटणे शक्य झाले नाही.
वाईत उदयनराजे यांच्यापेक्षा पाटील यांना विक्रमी मतदान झाले. कराड उत्तर, दक्षिण व पाटण या मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांचा दांडगा संपर्क, कराड व पाटणशी असणारी नाळ, विधानसभा उमेदवारांशी समन्वयाने झालेला प्रचार व शरद पवारांनी पाटील यांच्या मागे उभी केलेली ताकद यामुळे जिल्ह्याच्या चार मतदारसंघांनी राष्ट्रवादीचा विजय सोपा केला. साताऱ्यात उदयनराजे यांचीच पकड असल्याचे दिसून आले. कोरेगावात विधानसभेचे महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांना एक लाख एक हजार 687 मतदान झाले. त्यापेक्षा जादा दीडशे मते कोरेगावात उदयनराजे यांना मिळाली. कोरेगाव मतदारसंघातील सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायत व छत्तीस गावांमध्ये उदयनराजेंनी लावलेल्या ताकदीला मतदारांनी चांगला कौल दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
विधानसभानिहाय मतदान
मतदार संघ श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले मताधिक्य
वाई 122707 95644 27063
कोरेगाव 95953 101638 5685
कराड उत्तर 114641 63762 50879
कराड दक्षिण 113550 81701 31849
पाटण 112348 84489 27859
सातारा 72864 118898 46034
सातारा, कोरेगावात उदयनराजेंना आघाडी
सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना एक लाख 18 हजार 898 तर विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख 17 हजार 334 मते मिळाली. उदयनराजे यांना शिवेंद्रराजे यांच्यापेक्षा एक हजार 564 मते अधिक मिळाली. कोरेगावमध्ये उदयनराजे यांना एक लाख एक हजार 638 तर महेश शिंदे यांना एक लाख एक 487 मते मिळाली. कोरेगावमध्ये शिंदे यांच्यापेक्षा उदयनराजे यांना 151 मते अधिक मिळाली.
विधानसभा उमेदवारांपेक्षा पाटील यांना अधिक मते
सातारा लोकसभा मतदारसंघात लोकसभा व विधानसभा उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर श्रीनिवास पाटील यांना वाई वगळता तीन ठिकाणी विधानसभा उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांना एक लाख 509 मते मिळाली. तर श्रीनिवास पाटील यांना एक लाख 14 हजार मते मिळाली. म्हणजे मतदारांनी पाटलांच्या खासदारकीला झुकते माप दिले आहे. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना 92 हजार 296 तर श्रीनिवास पाटील यांना एक लाख 13 हजार 550 मते मिळाली. म्हणजेच चव्हाण यांच्यापेक्षा पाटील यांना 21 हजार मते जादा मिळाली. वाईमध्ये श्रीनिवास पाटील यांना एक लाख 22 हजार 707 तर मकरंद पाटील यांना एक लाख 39 हजार एवढे मते मिळाली. पाटणमध्ये महायुतीचे विजयी उमेदवार शंभूराज देसाई यांना एक लाख पाच हजार 965 मते मिळाली. श्रीनिवास पाटील यांचे मूळ गाव मारूल हवेली पाटण तालुक्यात आहे. स्थानिक उमेदवार म्हणूनही पाटील यांना मोठा फायदा झाला. पाटण मतदारसंघातून पाटील यांना एक लाख 12 हजार 348 मते मिळाली.