श्रीनगर : तिसऱ्यांना देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये दाखल होत असून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी शेर ए कश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये एम्पॉवरींग युथ, ट्रान्सफॉर्मिंग जे ॲंड के या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात १५०० कोटी रूपयांच्या विविध विकासप्रकल्पांचे उदघाटन होणार असून १८०० कोटी रूपयांचा एक कृषिविषयक प्रकल्पही लॉंच केला जाणार आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभाग घेतील. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त काश्मीरमध्ये अगदी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल ७ हजार नागरिक योग दिनानिमित्त मोदींसोबत कार्यक्रमात सहभागी होतील. या नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून योग प्रशिक्षण दिले जाते आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेत कार्यक्रम स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून बहुस्तरिय सुरक्षा कडे निर्माण करण्यात आले आहे. ड्रोन्स आणि क्वाडकॉप्टर्ससाठी तात्पुरता रेड झोन घोषित करण्यात आला आहे. या काळात कोणी ड्रोन उडवताना आढळला तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.