पुणे | श्रीमंत बाजीराव पेशवे हे शौर्याचे मेरुमणी – डॉ. गो.बं. देगलूरकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, तेव्हा रायगडासह विविध ठिकाणच्या वास्तू पाडल्या. त्या वास्तू पाहताना सगळ्यांच्या अंगात स्फूर्ती येईल, ही भीती त्यांना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, तर बाजीराव पेशवे यांनी साम्राज्य उभे केले.
असा राष्ट्रपुरुष होणे नाही. त्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे हे शौर्याचे मेरुमणी होते, असे प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२४ व्या जयंती दिनी थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना टिळक रस्त्यावरील आय. एम. ए. बिल्डिंग संचेती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पेशव्यांचे वंशज पुष्कर सिंह पेशवा,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उमेश देशमुख आदी उपस्थित होते. खा. प्रा. कुलकर्णी, पाटील, एअर मार्शल गोखले, पेटकर यांचीही भाषणे झाली. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.




