पुणे जिल्हा | श्रीक्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा होणार कायापालट

इंदापूर (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडवाडी येथील श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पूरप्रतिबंधात्मक संरक्षक भिंत व घाट बांधणीच्या कामासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून आज सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर झाला.
या निमित्ताने आमदार भरणे यांनी महिनाभरापूर्वी गावकर्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. श्रीक्षेत्र नंदिकेश्वर हे नीरा नदीच्या काठावर वसलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून हे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे.
या तीर्थक्षेत्राचा उल्लेख वेदपुराणातही आढळतो. या ठिकाणी वर्षभर असंख्य भाविकांची मंदियाळी असते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचे महत्व लक्षात घेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी येणार्या भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजवर लाखो रुपयांचा निधी दिला असुन यातुन अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.
मात्र हे देवस्थान निरा नदीच्या अगदी काठावर वसले असल्यामुळे निरा नदीला येणार्या पुरामुळे या मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे यावर ठोस उपाययोजना करण्याची सातत्याने मागणी केली होती.





