लोणी धामणी- मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावात बंद पाळला असून, सरपंच कोंडीभाऊ आदक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने गावात औषधांची फवारणी करण्यात येऊन गावातील परिसर निर्जंतूक करण्यात आला आहे. यावेळी संतोष आदक यांच्यासह गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व युवक उपस्थित होते. गावातील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व विविध सेवाभावी संघटना यांच्यामार्फत ग्रामस्थांना करोना विषाणूमुळे होणाऱ्या गंभीर साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुणे, मुंबई, तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. अंगणवाडी सेविक मंगल आदक, मदतनीस राणी बगाटे, आशा वर्कर रूपाली आदक यांनी घरोघरी जाऊन डेटॉल साबणाचे वाटप केले.