SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाच्या नियुक्तीचे गौडबंगाल वाढत असून, ही नियुक्ती अद्यापही गुलदस्त्यात आहे. डॉ. मनोहर सानप यांची या पदावर नियुक्ती झाल्याची जोरदार चर्चा असतानाच, विद्यापीठ प्रशासनाने अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. नियुक्तीचे पत्र दिल्याचे तोंडी सांगितले जात असले, तरी ते सार्वजनिक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने विद्यापीठ वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी डॉ. सानप यांना नियुक्तीचे पत्र दिले असले, तरी त्यात काही ‘जाचक’ अटींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित संस्थेकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी), कार्यमुक्तीचे पत्र आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी त्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अशा स्थितीत डाॅ. सानप यांना ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे शक्य आहे का, हेच आता पाहावे लागणार आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या अधिसभेत कुलसचिव नियुक्तीवरून गदारोळ निर्माण होऊ नये, त्यासाठीच ही घाईगडबड केल्याची चर्चा सुरू आहे. डाॅ. सानप यांना त्यांच्या संबंधित संस्थेने यापूर्वीच एनओसी न देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब माहीत असतानाही विद्यापीठाने त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावरून नियुक्ती प्रकरणावर विद्यापीठ प्रशासन जनतेची फसवणूक करीत आहेत. वर्षभरापूर्वी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यांची नियुक्ती करणे अपेक्षित होते. – धनंजय कुलकर्णी, माजी अधिसभा सदस्य विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दीड वर्षानंतर एखाद्या पदावर एवढ्या उशिरा नियुक्ती कशी केली जाऊ शकते, हा प्रश्न आहे. यूजीसीच्या नियमानुसार ही नियुक्ती बेकायदेशीर असून, त्यांना नियुक्तीचे पत्र देणे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. – कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवा सेना