प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संथकारभाराचा फटका पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने हिरवा कंदील दाखवून महिना उलटला, तरीही पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. निर्णयाची अंमलबजावणी करण्यास परीक्षा विभाग टाळाटाळ करीत असल्याने पदवीच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तब्बल एक लाखांहून अधिक विद्यार्थी या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. केवळ एक ते दोन विषयांत नापास झाल्याने आणि अभ्यासक्रमाची सत्रपूर्तता संपल्याने या विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. पदवी हातातोंडाशी असताना केवळ तांत्रिक कारणामुळे ती अडकल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत, त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यास एक महिन्यापूर्वीच मंजुरी दिली आहे.मात्र, प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विद्यापीठाने यापूर्वी एक पत्रक काढून स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल आणि निकष व नियमावली यथावकाश प्रसिद्ध केली जाईल, असे उत्तर दिले होते. आता, महिना उलटून गेला तरी हे यथावकाश नक्की कधी येणार, असा संतप्त सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. परीक्षा अर्ज कधी भरायचे आणि परीक्षा कधी होणार, याबाबत परीक्षा विभागाकडून अधिकृतरीत्या काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. विद्यार्थी वारंवार हेलपाटे मारत असूनही त्यांच्या पदरात निराशाच पडत असल्याने विद्यापीठाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.