SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीपासून केवळ काही पावले दूर असलेल्या, मात्र बॅकलाॅग विषयांच्या कचाट्यात अडकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अंतिम आणि अंतिमपूर्व वर्षांतील बॅकलाॅग विषय पूर्ण करून पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधी देण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला असून, यासाठीची परीक्षा अर्ज प्रक्रिया येत्या ११ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांचे काही विषय अद्याप सुटलेले नसल्याने त्यांची पदवी रखडली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून परीक्षा विभागाने त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या विद्यापीठ स्तरावर या विद्यार्थ्यांच्या समकक्ष विषयांची पडताळणी, त्यांना यापूर्वी मिळालेल्या संधींचा आढावा, प्राप्त झालेल्या तक्रारी आणि प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणांची छाननी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११ मे पासून अर्जाची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना या निर्णयाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचित केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये या प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम राहू नये आणि पात्र विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती वेळेत पोहोचावी, यासाठी महाविद्यालयांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.